मुक्ताईनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस एकाच दिवसात तीन जणांना चावा; नगरपंचायत प्रशासन सुस्त?

Advertisement

मुक्ताईनगर शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकाच दिवसात भटक्या कुत्र्यांनी तीन नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली असून नगरपंचायतीकडून मात्र ठोस उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ तसेच वसाहती परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सकाळी-संध्याकाळी कामावर जाणारे नागरिक, शाळेत जाणारे विद्यार्थी व सायकलस्वार यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः लहान विद्यार्थी शाळा व क्लाससाठी जाताना जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे चित्र आहे.

Advertisement

काल संताजी नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका अल्पवयीन मुलासह दोन नागरिकांवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीमार्फत दरवर्षी टेंडर काढण्यात येते. मात्र यावर्षी अद्याप कुत्रे पकडण्याचे टेंडर काढण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, टेंडर नसल्यामुळे कुणालाही कुत्रे पकडण्याचे काम करायला तयारी नसल्याचे सांगण्यात आले.

“एखाद्याचा जीव गेल्यावरच नगरपंचायत प्रशासन जागे होणार का?” असा सवाल आता मुक्ताईनगरमधील नागरिक उपस्थित करत आहेत. नागरिकांचा जीव इतका स्वस्त आहे का, अशी संतप्त चर्चा शहरात जोर धरत आहे. नगरपंचायतीने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.

Subscribe to Viral News Live

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here