मुक्ताईनगर, दि. ७ (अतिक खान):
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली-घोडसगाव गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे सभापतीपद भूषवणारे अॅड. मनोहर खैरनार यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
ना. गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे, “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात हा प्रवेश सोहळा पार पडला.
अॅड. खैरनार यांनी आपल्या सभापतीपदाच्या कार्यकाळात मुक्ताईनगर तालुक्यासाठी विविध विकासकामे, मागासवर्गीयांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभार यावर भर दिला. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून प्रशासनाशी संबंधित कामकाज पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी लिहिलेली अनेक पत्रे आजही ग्रामस्थांनी दस्तऐवजाप्रमाणे जतन करून ठेवली आहेत.
ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांशी घट्ट नाळ असलेल्या अॅड. खैरनार यांच्या भाजप प्रवेशानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत व अभिनंदन केले आहे.





