उदयनगर : बुलढाणा शहराजवळ भादोला येथे सुरू असलेल्या भव्य इजतेमा कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दत्ता भुतेकर यांच्या पुढाकारातून इजतेमासाठी दाखल झालेल्या हजारो मुस्लिम भाविकांना १४ डिसेंबर रोजी पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक सेवेची जोड देण्याचा पायंडा शेतकरी कामगार पक्षाने पुन्हा एकदा गिरवला आहे. १२ डिसेंबर पासूनच परिसरात इजतेमासाठी भाविकांची मोठी गर्दी जमने सुरु होती. या गर्दीचे नियोजन आणि भाविकांची गरज लक्षात घेऊन ॲड. भुतेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परतेने आज दि.१४ डिसेंबर रोजी पाण्याचे वाटप केले.
या उपक्रमादरम्यान ॲड. दत्ता भुतेकर यांनी केवळ सेवाच केली नाही, तर उपस्थित मुस्लिम बांधवांशी आपुलकीने संवादही साधला. त्यांनी इजतेमाचे महत्त्व जाणून घेत, अशा कार्यक्रमांतून समाजात शांतता, एकोपा आणि परस्परांबद्दल आदरभाव वाढीस लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. “समाजात सलोखा राखण्यासाठी आणि माणुसकीचे नाते घट्ट करण्यासाठी शेकाप सदैव कटिबद्ध असून असे उपक्रम सातत्याने राबविले जातील,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.गर्दीच्या वेळी पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. शेतकरी कामगार पक्षाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वस्तरातून आणि विशेषतः मुस्लिम बांधवांकडून स्वागत होत आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचे हे चित्र बुलढाणेकरांसाठी कौतुकाचा विषय ठरले आहे.
बुलढाणाच्या भव्य इजतेमात ‘शेकाप’कडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन; भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप
Advertisement
Subscribe to Viral News Live





